पालिकेच्या वर्गखोल्यांचे भाडे रखडले, कोरोनामुळे खासगी शाळा आर्थिक संकटात

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खासगी शिक्षण संस्थांचे मुंबई महापालिका शाळांच्या वर्गखोल्यांचे वार्षिक भाडे रखडले आहे. विविध वॉर्डांतील महापालिका शाळांच्या सुमारे दीड हजार वर्गात 211 खासगी शाळा भाडेतत्त्वावर चालविल्या जातात. मात्र यंदा कोरोनामुळे शाळाच सुरू झालेल्या नाहीत. या शाळांना शिक्षण विभागाकडून अनुदान मिळत नसल्याने विद्यार्थ्यांकडून मिळणाऱया फीच्या पैशातूनच शाळा चालविली जाते. मात्र बहुसंख्य पालकांनी आर्थिक अडचणींमुळे पाल्याची फीदेखील भरलेली नाही.

महानगरपालिकेच्या एकूण 24 वॉर्डांतील शालेय इमारतींतील सुमारे 1500 वर्गखोल्यांमध्ये सुमारे 211 खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांचे वर्ग भाडेतत्त्वावर चालविले जातात. यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती व उर्दू माध्यमाच्या अनुदानित व विनाअनुदानित खासगी शाळांचा समावेश आहे. वर्गखोल्यांसाठी दरवर्षी 10 टक्केवाढीने वार्षिक भाडे आकारले जाते. वार्षिक भाडय़ापोटी सुमारे 2.50 कोटी इतकी रक्कम शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालिकेकडे अग्रीम स्वरूपात भरली जाते. मात्र यंदा कोरोनामुळे मार्च 2020 पासून शाळाच बंद आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेले नाहीत. त्यामुळे फीअभावी शाळा आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच महापालिकेने 2001 पासून अनुदानित प्राथमिक शाळांना वेतनेतर अनुदान दिलेले नाही. राज्य सरकारकडे 2003 पासून अनुदानित शाळांना 1 टक्का दराने देय असलेले इमारत भाडे अनुदानही थकलेले आहे.

या वर्षीचे भाडे माफ करण्याची मागणी

या 211 खासगी प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, रात्रशाळांमध्ये सुमारे 2000 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे 40 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आणि मागसवर्गीय समाजातील आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी पालिकेने या वर्गखोल्यांचे भाडे माफ करण्याची मागणी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेने केली आहे. संघटनेचे कार्यवाह सदानंद रावराणे, सहकार्यवाह विनय राऊत यांनी या शाळा जिवंत ठेवण्यासाठी पालिकेकडे केवळ गेल्या वर्षीचे भाडे माफ करण्याची मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या