
मुंबईत गेल्या एकाच दिवसांत तब्बल 2 हजार 587 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 42 हजार 331 वर पोहोचली आहे. दरम्यान, एकाच दिवसांत 1460 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने आज जाहीर केलेल्या मृतांच्या एकूण आकडेवारीत गेल्या 24 तासांत झालेल्या 41 मृत्यूंसह 64 प्रलंबित मृत्यू अहवालांचा समावेश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4282 झाली आहे. या 105 मृतांमध्ये 72 पुरुष आणि 33 महिलांचा समावेश आहे. यातील 69 जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते. तर 41 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील आणि 7 रुग्ण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. शिवाय 88 रुग्णांना काही दीर्घकालीन आजारही होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, मुंबईत आता 27 हजार 134 अॅक्टिव्ह केसेस असल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



























































