MCAकडून चालढकल; क्रिकेट सुधारणा समितीची निवड केली, पण कामाला सुरुवात नाही

220

बीसीसीआयने आगामी स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय मोसमासाठी पावले उचलायला सुरुवात केलीय. आयपीएलचा बिगुल वाजलाय. रणजी तसेच मुश्ताक अली टी-20 स्पर्धेच्या आयोजनासाठी योजना तयार केली जात आहे. मात्र याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (एमसीए) अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. एमसीएच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत क्रिकेट सुधारणा समिती सदस्यांची निवड करण्यात आली, पण प्रत्यक्षात अजून कामाला सुरुवात झालेली नाही ही खेदजनक बाब. एमसीएकडून करण्यात येत असलेल्या चालढकलीमुळे मुंबईतील क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीवर परिणाम होऊ शकतो.

एमसीएच्या झालेल्या बैठकीत निवड समितीत तीन सदस्यांना स्थान देण्यात आले. यामध्ये राजू कुलकर्णी, लालचंद राजपूत व समीर दिघे यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 27 जुलैपर्यंत या तिन्ही व्यक्तींकडून एमसीएकडून आवश्यक असणारी पूर्तताही करण्यात आली, पण तरीही त्यांना अजूनही नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत आगामी मोसमाचा आराखडा कसा काय आखण्यात येईल? हा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.

कोणत्या स्पर्धा होतील आणि कोणत्या स्पर्धांना रेड सिग्नल मिळेल?

मुंबईत प्रत्येक वर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये कांगा लीग, हॅरिस व गाईल्स शिल्ड, पोलीस शिल्ड, पुरुषोत्तम, कॉम्रेड शिल्ड, टाईम्स शिल्ड यांसारख्या स्पर्धांमधून असंख्य क्रिकेटपटू आपल्या खेळाची चमक दाखवत असतात. मुंबईचे खेळाडू विविध वयोगटांतील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. आता यावेळी असा प्रश्न निर्माण होतो की, या मोसमात कोणत्या स्पर्धा आयोजनासाठी एमसीए पुढाकार घेतेय तसेच कोणत्या स्पर्धांना रेड सिग्नल दाखवण्यात येतोय?

आपली प्रतिक्रिया द्या