
मीरा रोडच्या टारझन ऑर्पेस्ट्रा बारवर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा धाड टाकली आणि ग्राहक व बारबालांची धरपकड केली. या छाप्यात पोलिसांनी झडती घेतली तेव्हा बारमध्ये भिंतीत केलेल्या चोरकपाटात चक्क बारबाला सापडल्या. बारबालांना लपवण्याची आयडिया इतकी भन्नाट होती की, आधी इलेक्ट्रिकचा प्लग बोर्डावर लावून बटन दाबले आणि नंतर भिंतीवर लाथ मारली. त्यानंतरच बारबाला लपवलेल्या कपाटाचा दरवाजा उघडला. हे खुल जा सिम सिम बघून पोलीस चाट पडले. या प्रकरणी 22 जणांना अटक केली असून 12 तरुणांची सुटका करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर परिसरात नियम धाब्यावर बसवून मोठय़ा प्रमाणावर ऑर्पेस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लील नृत्य चालते. गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गणपत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी टारझन बारवर धाड टाकली. त्या वेळी अनेक बारबाला अश्लील नृत्य करीत होत्या. पोलिसांनी टारझन बारचे मालक रमण शेट्टी, सिद्धार्थ शेट्टी, पॅशियर मोहित चौरसिया यांनाही ताब्यात घेतले.
अपुरा उजेड… श्वास घेणेही कठीण
टारझन बारच्या कर्मचाऱयांनी इलेक्ट्रीकचा प्लग लावला आणि बटण दाबले. तसेच जोरात लाथ मारली. दरवाजा उघडताच पोलिसांना धक्काच बसला. भिंतीच्या आतमध्ये पाच तरुणी कपाटात कशाबशा लपून बसल्या होत्या. तिथे अपुरा उजेड होता. तसेच श्वास घेणेही कठीण झाले होते. अशा घुसमटलेल्या अवस्थेत लपलेल्या या मुलींची पोलिसांनी तत्काळ सुटका केली. दरम्यान बारमालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.