
मुंबईतील शिवाजी नगर परिसरात प्रेम, धोका आणि सूडबुद्धीने पेटलेल्या एका भीषण गुन्ह्याची घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकराच्या जवळ जात असल्याच्या संशयावरून एका 25 वर्षीय महिलेने 19 वर्षीय शिफा नावाच्या तरुणीची गोळी झाडून हत्या केली. मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी फुरकानिया परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून, मुंबई पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिफा आणि आरोपी महिला या दोघींचे एकाच तरुणावर प्रेम होते. या लव्ह ट्रॅंगलमुळे त्यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होते. याच वादाचा कायमचा निकाल लावण्यासाठी आरोपी महिलेने आपल्या 23 वर्षीय साथीदाराच्या मदतीने हत्येचा कट रचला. मंगळवारी दुपारी संधी साधून शिफाला गाठण्यात आले आणि तिच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. गोळी शिफाच्या चेहऱ्याला लागल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
भरवस्तीत दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबारामुळे शिवाजी नगर परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून डीसीपी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक देखरेखीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. सुरुवातीला हा केवळ महिला हल्लेखोराचा वैयक्तिक रागाचा प्रकार वाटत असला, तरी तपासात प्रियकराशी असलेल्या संबंधांतून हा कट रचला गेल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी 25 वर्षीय मुख्य आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराला अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

























































