
अवकाश मोहिमा कशा राबवल्या गेल्या? न्यूक्लीअर रिऍक्टरचे काम कसे चालते? गुरुत्वाकर्षण लहरींचे निरीक्षण कसे केले जाते? हवेचा दर्जा कसा मोजला जातो? या प्रश्नांची प्रात्यक्षिकांसह उत्तरे देतानाच माटुंगा येथील आभाळात आज अत्याधुनिक ड्रोन्सची शर्यत रंगली. निमित्त होते वीर जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टिटय़ूटमध्ये (व्हीजेटीआय) सुरू झालेल्या ‘टेक्नोव्हान्झा 2019’ महोत्सवाचे.
शुक्रवारपासून हा महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवात विज्ञान-तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आर. के. सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेला हा महोत्सव 29 डिसेंबरपर्यंत मुंबईकरांसाठी खुला आहे. हिंदुस्थानच्या इस्त्राsचे शास्त्रज्ञ आपल्या अंतराळ मोहिमांची माहिती मॉडेल्ससह या महोत्सवात देत आहेत.
अणुऊर्जेसाठी वापरल्या जाणाऱया रिऍक्टरचे काम कसे चालते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी भाभा अणुशक्ती संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञही या महोत्सवात सहभागी झाले आहेत.
क्यूब ओपन हा खेळही या महोत्सवात आयोजित करण्यात आला होता. आज त्या खेळात नवा विश्वविक्रम प्रस्थापित झाला. मोहम्मद आयमन कोळी याने 15.56 सेकंदांत क्यूब सोडवून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडला. या शर्यतीसाठी दोन लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.


























































