
मुंबई आणि उपनगरांमध्ये काम करणाऱया चाकरमान्यांना अगदी वेळेत जेवणाचे डबे पोहोचवणारा ‘मुंबईचा डबेवाला’ सोमवारपासून सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त ही सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती डबेवाला संघटनेकडून देण्यात आली आहे. मुंबईचा डबेवाला गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता दररोज चाकरमान्यांना जेवण्याचे डबे पोहचवत आहेत. मात्र या डबेवाल्यांमधील बहुतांश जण हे जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, अकोला, संगमनेर अशा विविध गावांमध्ये विस्तारलेले आहेत. दरम्यान अनेक गावांमध्ये जत्रा, कुलदैवत पूजा, कुलाचार आणि शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत, तर बहुतेक गावांमध्ये ग्रामदेवतेचा उत्सव असल्याने या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईचे डबेवाले सहा दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत.
























































