गोविंदा रे गोपाळा… मुंबईसह ठाण्यात आज जल्लोष

सर्वत्र दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गोविंदा रे गोपाळा म्हणत मुंबई, ठाण्यातील मानाच्या दहीहंडय़ा फोडून लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथके शनिवारी सकाळपासून घराबाहेर पडणार आहेत. गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी मनोरंजनपर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

हिंदू कॉलनीत भव्य दहीहंडी उत्सव

पसायदान या बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दादरच्या हिंदू कॉलनीतील पहिली गल्ली येथे 21 लाख रुपयांच्या बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. जोगेश्वरीचे जय जवान गोविंदा पथक सलामी देणार आहे. प्रथम येणाऱया 50 गोविंदांना प्रवेश दिला जाईल, अशी माहिती अध्यक्ष रुपाली काणकोणकर यांनी दिली.

वरळीत मानाची दहीहंडी

शिवसेना आणि युवासेना वरळी विधानसभेच्यावतीने वरळी श्रीराम मिल नाका येथील श्री साई गजानन मंदीर ट्रस्ट येथे उत्सव रंगणार आहे. गोविंदांना 1 लाख 98 हजार 198 रुपयांच्या रोख बक्षीसांना वर्षाव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजक, युवा विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी दिली.

ठाण्यात निष्ठेची हंडी

ठाण्यात जांभळी नाक्याच्या चिंतामणी चौकात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते राजन विचारे यांच्या वतीने गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1, 11,111 रुपयांचे रोख बक्षीस आणि आकर्षक स्मृती चषक हंडी फोडणाऱया मंडळाला दिले जाणार आहे. तर महिलांसाठी असलेली हंडी फोडणाऱया गोविंदा पथकाला स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या नावाने 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव विनायक राऊत, आदेश बांदेकर हे उपस्थित राहणार आहेत.

श्री आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने चिंतामणी चौक, जांभळी नाका येथे दहीहंडीचा सोहळा आयोजित करण्यात आला.या उत्सवात दिव्यांग तसेच पॅन्सरने पीडित असलेल्या बाळगोपाळांनी मोठय़ा उत्साहात सहभाग घेतला.

ताडदेवमध्ये दहीहंडीचा थरार  

मॉंसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्ताने ममता चषक दहीहंडीचा थरार ताडदेव फिल्म सेंटरजवळील भव्य पटांगणात पाहायला मिळणार आहे. शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांच्या आयोजनाखाली रंगणाऱया या महोत्सवात 4,44,444च्या रोख बक्षिसांचा वर्षाव होईल. महिला गोविंदा, अंध मुलांचा गोविंदा, विनाशिडी गोविंदा, चक्री गोविंदा यांना गौरविण्यात येईल.

गोपिका सज्ज

गेल्या महिनाभरापासून महिला गोविंदा पथकांचे सराव जोरात सुरू आहेत. लोअर परळ येथील बाल दत्तगुरू गोविंदा पथकाच्या गोपिका मोठय़ा उत्साहाने दहीहंडीचा सराव करताना दिसत आहेत. पार्ले स्पोर्ट्स क्लब ‘जोगेश्वरी माता’, ‘शिवशक्ती’ (वडाळा), ‘स्वस्तिक’सारखी पथके सातव्या थरावर पोहोचण्यासाठी उत्सुक आहेत. गोविंदा पथकांसह गोपिकांच्या पथकांचीही संख्या शंभरीपलीकडे पोहोचली आहे.