
मुंबईत शाळा प्रवेशासाठी दलाल आहेत. अॅडमिशन माफिया झाले आहेत. सामान्य माणूस रखडतो पण दलालाच्या माध्यमातून शाळेत अॅडमिशन मिळतात, अशा शब्दांत भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी शालार्थ आयडी घोटाळ्यावर बोलताना शिक्षण खात्याला आज घरचा अहेर दिला. दरम्यान शालार्थ आयडी घोटळा प्रकरणी मुंबई शिक्षण मंडळाचे उपसंचालक संदीप सांगवे यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.
उपाध्याय यांनी तत्कालीन शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांनी शिक्षण समायोजनात अनियमितता आणल्याचा आरोप करीत यासंदर्भातील लक्षवेधी गुरुवारी विधानसभेत मांडली. विधानसभेत प्रश्न मांडू नये म्हणून काही मला शोधत घरच्या पत्त्यावर आले होते, असा आरोप त्यांनी केला. चर्चेत भाग घेताना शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा, महाराष्ट्र व मुंबई पोलिसांचे पथक स्थापन करा. शालार्थ आयडीची चौकशी करताना बोगस भरतीचीही चौकशी करण्याची मागणी केली. काही लोक आपल्या घरी आले होते असे संजय उपाध्याय यांनी सांगितले होते. त्याचा संदर्भ देताना वरुण सरदेसाई यांनी सत्ताधारी आमदाराच्या घरचा पत्ता शोधण्याची कोणाची हिंमत होते… विधासभा सदस्यांना कोण धमकी देतो, असा सवालही केला. या चर्चेला उत्तर देताना दादा भुसे यांनी संदीप सांगवे यांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच राज्याच्या इतर जिह्यांतही शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्यव्यापी एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले. एसआयटीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात येईल, असे त्यांनी या वेळी जाहीर केले.