
मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून फेब्रुवारी मध्यापासून सुरू झालेल्या दुसऱया लाटेदरम्यान आज सातव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱया दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये 6 तर माहीममध्ये 4 रुग्ण सापडले.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले असून धारावीत आज सातव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. मात्र सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या दोन आठवडय़ांत 21 वरून 38 वर पोहोचली आहे. धारावीत या आधी 14 आणि 15 जूनला सलग दोन वेळा एकही रुग्ण सापडला नाही तर 23 जून, 4 जुलै, 7 जुलै आणि 17 जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता.
विशेष लसीकरणात 4,500 जणांचे लसीकरण
धारावीत सिटी बँक आणि जसलोक रुग्णालयाच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम 27 जूनपासून सुरू करण्यात आली असून यात महिनाभरात एक लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 4 हजार 500 जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जी-उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
सक्रिय रुग्णसंख्या शंभरच्या आत
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान गेल्या दोन आठवडय़ांत दादर, माहीम आणि धारावीत सक्रिय रुग्णसंख्या शंभरच्या आत आली आहे. दादरमध्ये 150 पर्यंत असलेली सक्रिय रुग्णसंख्या आता 90 वर आली आहे. मात्र, दिवसाची सरासरी रुग्णसंख्या घटली असून आज दादरमध्ये 6 रुग्ण सापडले. माहीममध्येही रुग्णसंख्या एक आकडी असली तर त्यात चढउतार होत आहेत. माहीममध्ये आज 4 रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या 72 वरून 66 वर आली आहे.



























































