
काही विक्रेते त्यांच्या हटके स्टाईलमुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या मुंबईतील एका डोसेवाल्याचा व्हिडीओ नेटिझन्समध्ये तुफान लोकप्रिय ठरतोय. त्याचे डोसा बनवण्याचे कसब पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीदेखील हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी म्हटलेय, ‘हा गृहस्थ कामाच्या बाबतीत रोबोटलासुद्धा मागे टाकू शकतो… मी त्याला पुनः पुन्हा पाहून थकलोय… आता मला खूप भूक लागली आहे.’ डोसा बनवणारे अनेक जण असतात. पण या व्यक्तीची डोसा तयार करण्याची अनोखी शैली आहे. मोठय़ा तव्यावर एकाच वेळी चार मसाला डोसा तयार करतो. हातातील मोठय़ा उलथण्याने झटपट डोसे कट करतो. त्यानंतर डोशाची घडी करून प्लेटमध्ये टाकतो. ती प्लेट तव्यावरूनच तो सहकाऱयाच्या दिशेने भिरकावतो. सहकारीदेखील प्लेटचा अचूक झेल घेत ती ग्राहकापर्यंत पोहोचवतो. 28 सेकंदांच्या या व्हिडीओला 25 लाखांहून अधिक ‘ह्यूज’ मिळाले आहेत.
























































