
परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी आज ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. सकाळी 11 वाजता अनिल परब ईडीच्या कार्यालयात पोहोचले. सायंकाळी 7.30 वाजता ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले तेव्हा ईडीच्या अधिकाऱयांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले.
परिवहनमंत्री अनिल परब यांना 13 ऑगस्ट रोजी ईडीने समन्स बजावले होते. त्यावेळी शासकीय कामांमध्ये व्यस्त असल्याने परब यांनी चौकशीसाठी मुदत मागितली होती. तसे पत्र त्यांनी ईडीला पाठवले होते. त्यानंतर आता दुसऱयांदा ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल परब हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. आपण ईडीच्या अधिकाऱयांना सर्व सहकार्य करणार असल्याचे त्यांनी चौकशीआधी स्पष्ट केले होते. ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर अनिल परब यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मला जे समन्स आले होते त्या समन्सच्या अनुषंगाने ईडी कार्यालयात आलो. ईडीच्या अधिकाऱयांनी जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना दिली आहेत. ईडी ही एक ऑथोरिटी आहे. त्या ऑथोरिटीला उत्तरे देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणा एका व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही. ऑथोरिटीने प्रश्न विचारले त्याला मी उत्तर दिले आहे.
























































