अकरावी प्रवेशाची शेवटची संधी तिसरी यादी आज जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

अकरावी प्रवेशाची तिसरी म्हणजेच शेवटची गुणवत्ता यादी आज 1 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. दुसऱया यादीत मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेले 41 हजार 718 विद्यार्थ्यांसह आतापर्यंत एकदाही गुणवत्ता यादीत नाव न आलेल्या विद्यार्थ्यांचे डोळे या यादीकडे लागले आहेत. पहिल्या व दुसऱया गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतलेल्या 16 हजार 344 विद्यार्थ्यांना तिसऱया यादीत प्रवेश मिळणार नाही.

पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळणार आहे. तिसऱया यादीनंतर अकरावी ऑनलाइनच्या नियमित प्रवेशफेऱया संपणार असून प्राचार्यांना कॉलेज सुरू करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत. 1 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 2, 3 आणि 5 ऑगस्ट रोजी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली आहे.

शेवटच्या यादीसाठी 1 लाख 8 हजार जागा
शेवटच्या यादीसाठी एकूण 1 लाख 8 हजार जागा शिल्लक आहेत. यातील आर्टस् शाखेच्या 14 हजार 260, कॉमर्सच्या 55 हजार 701, सायन्सच्या 35 हजार 674 आणि एचसीव्हीसीच्या 2 हजार 582 जागा आहेत.

5 ऑगस्टला रिक्त जागा जाहीर होणार
अकरावी प्रवेशाच्या तीनही प्रवेशफेऱयांनंतर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील आणि तिसऱया यादीचा कटऑफ 5 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता जाहीर होणार आहे. या रिक्त जागांनुसार विशेष गुणवत्ता फेरी राबविली जाणार आहे. विशेष फेरीनंतरही प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी’ राबविण्यात येणार आहे. या फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले.

विशेष गुणवत्ता फेरीचे वेळापत्रक
6 व 7 ऑगस्ट – ऑनलाइन प्रवेशअर्ज भरणे ,9 ऑगस्ट – विशेष गुणवत्ता यादी जाहीर .10, 13 ऑगस्ट – कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेणे.14 ऑगस्ट – रिक्त जागा जाहीर