मुंबईची धाकधूक कायम! इंग्लंड रिटर्न पॉझिटिव्हच्या संपर्कातील पंधरा जणांना कोरोना!

मुंबईत कोरोना आटोक्यात येत असतानाच इंग्लंड रिटर्न प्रवाशांच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळणार्‍यांची संख्या आज 30 वर गेली आहे. यातच संबंधित पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील पंधरा जणांनाही कोरोनाची लागण झाल्याने मुंबईची धाकधूक कायम राहिली आहे. त्यामुळे पालिकेने या सर्वांचे नमुने नॅशनल इन्सिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीकडे ब्रिटिश कोरोना तपासणीसाठी पाठवले आहेत.

इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत परतलेल्या 2623 प्रवाशांचा शोध घेऊन प्रत्येकाची ‘आरटी-पीसीआर’ चाचणी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्य सरकारने पालिकेला इंग्लंडमधून परतलेल्या प्रवाशांच्या दिलेल्या यादीनुसार आतापर्यंत 2521 जणांचा शोध लागला असून त्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. यामध्ये पॉझिटिव्ह आढळणार्‍यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीकडे ब्रिटिश कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. या पुनर्तपासणीत 5 जानेवारीला 3 तर 6 जानेवारीला 2 रुग्णांना ब्रिटिश कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, संपर्कातील लागण झालेल्या पंधरा जणांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे ब्रिटिश कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले असून येत्या एक-दोन दिवसांत त्यांचा अहवाल येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी होतेय कार्यवाही

इंग्लंड रिटर्न प्रवाशांच्या 6 जानेवारीपर्यंत 1417 जणांची चाचणी करण्यात आली असून यातील 18 जणांना कोरोनाची लक्षणे होती. मात्र यातील सर्वांची प्रकृती आता मात्र उत्तम असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, पालिकेच्या माध्यमातून इंग्लंड रिटर्न प्रवाशांची चाचणी वेगाने करण्यात येत असून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या प्रमुख कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

आतापर्यंत 1417 जणांची चाचणी

– गेल्या महिनाभरात इंग्लंडमधून परतलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत 1417 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
– पॉझिटिव्ह आढळलेल्या 29 रुग्णांचे आणि काँटॅक्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या 15 जणांचे सँपल पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे ब्रिटिश कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले.
– इंग्लंडमधून गेल्या महिनाभरात परतलेल्या 745 प्रवाशांनी 28 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. तर 2503 प्रवाशांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

आपली प्रतिक्रिया द्या