अग्निशमन दलाचे 44 कर्मचारी कोरोनामुक्त; 47 जणांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला रोखण्यासाठी पालिका, पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारीही अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र, निर्जंतुकीकरणाचे काम करताना अग्निशमन दलाच्या अनेक जवानांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत 44 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून 47 जणांवर विविध रुग्णालये, कोरोनो सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिका, पोलीस कर्मचाराऱ्यांबरोबरच अग्निशमन दलाच्या जवानांनी दमदार भूमिका बजावली आहे. मुंबईतील विविध भागांत सापडलेल्या कोरोना रुग्णांचे घर त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे महत्त्वाचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले आहे. इमारती, रस्त्यांचे निर्जंतुकीकरणही मोठ्या आणि अत्याधुनिक यंत्रांच्या मदतीने अग्निशमन दलाने केले आहे.

अग्निशमन दल अधिकारी कोरोनामुक्त

विभागीय अग्निशमन दल अधिकारी ए. व्ही. परब यांच्यावर गेले महिनाभर परळच्या ग्लोबल रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरू होते. कोरोनामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. त्यांना आयसीयूमध्ये 20 दिवसांहून जास्त दिवस ठेवण्यात आले होते. मात्र, कोरोनाला काहीही करून हरवायचे, असा निश्चय केलेले परब आज अखेर कोरोनामुक्त होऊन दादरच्या घरी परतले. त्यावेळी अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी त्यांना फुले देऊन त्यांचे स्वागत केले आणि कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले.