
एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने सोमवारी मुंबईतील बीकेसी येथील अपस्केल वनमध्ये हिंदुस्थानातील पहिले सुपर चार्जिंग स्टेशन अधिकृतपणे लाँच केले. मुंबईत पहिले शोरूम उघडल्यानंतर आज कंपनीने मुंबईतच पहिले सुपरचार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. 15 जुलैला टेस्ला कंपनीने आपले टेस्ला मॉडेल वाय मुंबईत लाँच केले होते. या मॉडेलची सुरुवातीची किंमत 59.89 लाखांपासून 73.89 लाखांपर्यंत (एक्स शोरूम) आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, टेस्लाचे मॉडेल अवघ्या 14 मिनिटांत चार्ज होणार आहे. म्हणजेच 14 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये कारला 300 किमीची रेंज मिळणार आहे. या नव्या चार्जिंग सेंटरमध्ये चार व्ही 4 सुपरचार्जर स्टॉल (डीसी फास्ट चार्जर) आणि चार डेस्टिनेशन चार्जिंग स्टॉल (एसी चार्जर) लावले आहेत. डेस्टिनेशन चार्जर 14 रुपये प्रति केडब्ल्यूएचच्या दराने 11 केडब्ल्यूच्या चार्जिंगची सुविधा देणार आहे. कंपनी लोअर परेल, ठाणे, नवी मुंबई अशा तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करणार आहे.
टेस्लाच्या अॅपवरून पेमेंट करा
हिंदुस्थानातील मॉडेल वाय कारला 15 मिनिटात सुपरचार्जिंगने 267 किलोमीटरपर्यंत रेंज देण्यात सक्षम आहेत. टेस्ला यूजर्स टेस्ला अॅपद्वारे चार्जिंग अॅक्सेस, मॉनिटर आणि पेमेंट करू शकतील. टेस्लाची बुकिंग सुरू आहे. टेस्ला मॉडल वाय हिंदुस्थानी बाजारात 60 केडब्ल्यूएच आणि 75 केडब्ल्यूएच बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या स्टँडर्ड व्हेरियंटमध्ये एक सिंगल इलेक्ट्रिक मोटर दिली आहे. जी 295 एचपीचे पॉवर जनरेट करते.
टेस्लाची कोणत्या कारशी स्पर्धा
टेस्ला कारची बुकिंग सध्या सुरू असून ही कार 22 हजार 220 रुपये देऊन बुक करता येईल. बुकिंगनंतर ही कार दिवाळीच्या आधी ग्राहकांना घरपोच मिळणार आहे. मार्केटमध्ये या कारची स्पर्धा मर्सिडीज, ऑडी, बीवायडी, टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाई यासारख्या इलेक्ट्रिक कारशी होईल. या कारमध्ये रियर टचस्क्रीन, अॅडजस्टेबल क्लायमेंट पंट्रोल वेंट्स, सीट पॅकेट, कप होल्डर्स, यूएसबी पोर्ट्स, रियर मॅन्युअल ओपनिंग डोअर हँडल यासारखे फिचर्स दिले आहेत.