शीव येथील दोन उड्डाणपूल अपघाताचे ब्लॅकस्पॉट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव परिसरात असलेले दोन उड्डाणपूल अपघाताचे ब्लॅकस्पॉट बनले आहेत. वर्षभरात या उड्डाणपुलावर अपघातांच्या अनेक घटना घडल्या. त्यापैकी 47 अपघातांत नागरिक जखमी झाले, तर अपघाती मृत्यूचे सात गुन्हे घडले. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी या उड्डाणपुलांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी लेखी विनंती शीव पोलिसांनी एमएमआरडीएकडे केली आहे. शीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवे अपार्टमेंट उड्डाणपूल  आणि शीव रुग्णालयासमोरील पूल असे दोन पूल आहेत. वर्षभरात या दोन्ही पुलांवर अनेक अपघात झाले. त्यापैकी बरेच अपघात किरकोळ स्वरूपाचे असल्यामुळे त्यांची नोंद घेतली गेली नाही, परंतु 47 अपघातांत नागरिक जखमी झाले, तर सात जणांना आपला जीव गमवावा लागला. हायवे अपार्टमेंट येथील पुलावर जखमी झालेल्या अपघाताचे 18 तर अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचे पाच गुन्हे घडले.