
मुंबईतील फुटपाथही आता दर्जेदार आणि चकचक करण्यासाठी पालिका मोठा खर्च करीत आहे. यामध्ये चेंबूर आणि माटुंग्यातील फुटपाथसह पाच कामांसाठी पालिका 51 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासन आगामी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडणार आहे.
मुंबईत 1800 किमीचे फुटपाथ आहेत. या वर्षीच्या अर्थसंकल्पात फुटपाथ, वाहतूक बेटे आणि पुलांखाली सौंदर्यीकरण आणि नागरिकांसाठी उद्यान, व्यायाम साधने अशा सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यामध्ये फुटपाथचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक कामे केली जाणार आहेत. यासाठी पालिकेने पदपथांच्या सुशोभीकरणासह दुरुस्तीसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती केली आहे.
या सल्लागाराच्या नियुक्तीनुसार काळा घोडा येथील नॅशनल गॅलरी ऑफ मोर्डन आर्ट समोरील पदपथाचे सुशोभीकरण केले आहे. यात बस थांब्याचे रूप पालटण्याबरोबर अपंगानाही चालता येईल व्हिलचेअरही पदपथावर घेऊन जाता येईल अशा पध्दतीने दुरुस्ती करण्यात आली आहे. वडाळा ते माटुंगापर्यंतचा सुमारे 1 किमी दोन्ही बाजूचा मिळून 2 किलोमिटर आणि चेंबूर येथील फुटपाथ दोन्ही बाजूने मिळून 3 किलोमिटर लांबीचा आहे. या फुटपाथच्या दुरुस्ती बरोबरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
असे होणार काम
माटुंगा आणि चेंबूर येथील दोन पदपथांच्या दुरुस्तीसह सुशोभीकरणासाठी पालिका तब्बल 32 कोटी 4 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. तर,गोरेगाव येथील एमम.जी मार्ग, वांद्रे पूर्व येथील आर.के.पी व संत ज्ञानेश्वर मंदिर रस्त्या लगातच्या पट्ट्यांची आणि पदपथांच्या दुरुस्तीसाठी 19 कोटी 70 लाख असा सुमारे 51 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
चेंबूर रेल्वे स्थानक ते डायमंड उद्याना पर्यंतचा 1 किलोमीटरचा फुटपाथ आहे. हा फुटपाथ सिमेंट कॉक्रिटचा करण्यात येणार असून दुरुस्ती बरोबरच सुशोभीकरणही करण्यात येणार आहे.
वडाळा संत जोसेफ सर्कल ते माटुंगा रुईया महाविद्यालय पर्यंत सुमारे 2 किलोमिटर लांबीचा फुटपाथ बेसॉल्ट दगडाचा आहे. या पदपथाच्या खालील उपयोगित सेवांचे जाळे कमी खोलीवर असल्याने दुरुस्ती सिमेंट कॉक्रिटने करण्यात येणार आहे.
गोरेगाव येथील एम.जी मार्गाचे पट्टे आणि पदपथ पेव्हर ब्लॉकचे आहेत.रस्त्यावरील पट्टय़ांच्या डांबरी करणासोबतच फुटपाथ सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहे.




























































