
जनरेशन झेड (Gen Z) च्या कार्यशैलीची सध्या कॉर्पोरेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईतील एका कंपनीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेने कामाच्या ठिकाणी असलेल्या नियमांबद्दल आणि व्यवस्थापनाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) च्या कडक बंदीचाच आधार घेत एका तरुण कर्मचाऱ्याने ऑफिसच्या वेळेनंतर आलेल्या क्लायंटच्या मेसेजकडे चक्क दुर्लक्ष केले. त्याने मॅनेजरला दिलेले उत्तर इतके मार्मिक होते की त्यामुळे ऑफिसमधील कामाच्या पद्धतीवर पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे.
मुंबईस्थित चार्टर्ड अकाउंटंट पारस गंगवाल यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही मजेशीर पण विचार करायला लावणारी घटना शेअर केली आहे. पोस्टनुसार, रोहित नावाचा एक तरुण कर्मचारी नुकताच एका कंपनीत रुजू झाला होता. त्याच्या पहिल्याच दिवशी व्यवस्थापनाने त्याला स्पष्ट केले होते की, कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ला सक्त मनाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीत घरून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही. रोहितने यावर कोणताही आक्षेप न घेता त्याने फक्त या नियमाचे तंतोतंत पालन करण्यास सुरुवात केली. तो दररोज वेळेवर ऑफिसला यायचा आणि वेळेवर लॉग ऑफ करून निघून जायचा. सर्व काही सुरळीत सुरू होते, पण एका संध्याकाळच्या घटनेने सर्व चित्रच बदलून टाकले.
एके दिवशी रात्री साधारण 8 च्या सुमारास रोहितला एका महत्त्वाच्या क्लायंटकडून मेसेज आला. मात्र, रोहितने त्या मेसेजला कोणताही रिप्लाय दिला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो ऑफिसला पोहोचला, तेव्हा त्याच्या मॅनेजरने त्याला क्लायंटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करण्याबाबत जाब विचारला यावर रोहितने अतिशय शांतपणे आणि हुशारीने उत्तर दिले. तो म्हणाला, “सर, मला वाटले की ऑफिसची वेळ संपल्यानंतर घरून मेसेजला उत्तर देणे हे ‘वर्क फ्रॉम होम’ मानले जाईल, ज्यावर तुम्ही आधीच कडक बंदी घातली आहे.” त्याचे हे अनपेक्षित आणि थेट उत्तर ऐकून मॅनेजरला काय बोलावे तेच सुचेनासे झाले.
या घटनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा कोणताही उघड निषेध नव्हता, तर ती एक प्रकारची शिस्त होती. रोहितने कंपनीचा एकही नियम मोडला नाही; उलट त्याने त्यांच्याच नियमांचे काटेकोरपणे पालन केले. या उदाहरणातून कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा विरोधाभास समोर आला आहे. कंपन्या ‘वर्क फ्रॉम होम’ नाकारताना कठोर नियम लावतात, पण त्याच वेळी कर्मचाऱ्यांनी ऑफिसची वेळ संपल्यानंतरही कामासाठी नेहमी उपलब्ध असावे, अशी अवाजवी अपेक्षाही ठेवतात. आजकालचे Gen Z कर्मचारी जुन्या पिढीप्रमाणे थेट वाद न घालता अतिशय शांतपणे आणि कंपनीच्याच नियमांचा वापर करून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याच्या मर्यादा निश्चित करत आहेत, हे या व्हायरल पोस्टमधून स्पष्टपणे अधोरेखित होते.

























































