मुंबईला 225 कोटींचा निर्भया फंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

देशातील प्रमुख आठ शहरांमधील महिलांना अधिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाची पावले उचलत ‘निर्भया फंड’ अंतर्गत 2 हजार ९१९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून मुंबई शहरासाठी २२५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

याबाबत केंद्रीय महिला व बालकल्याण राज्यमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार लोकसभेत शुक्रवारी म्हणाले, ८ शहरांमध्ये महिलांना अधिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी निर्भया फंड अंतर्गत एकूण २ हजार ९१९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मुंबईसाठी २२५ कोटींचा निधी देण्यात आला असून मुंबईसह दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि लखनौ या शहरांची निवड करण्यात आली. निर्भया फंड अंतर्गत मुंबई शहरातील गुन्हे प्रवण भागात जीआयएस मॅपिंग सेवा उभारण्यासाठी, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी, गुन्हे तपास अधिकारी व विधी विभागाच्या अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. झोपडपट्टी भागातील महिलांवरील शारीरिक अत्याचारांच्या गुह्यांमध्ये पोलीस दीदी कार्यक्रमास सक्षम करण्यात येते, तसेच माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यात येतो.