
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहनांना बंदी घातलेली असतानाही या आदेशाला धाब्यावर बसवून अनेक अवजड वाहने महामार्गावरून धावत आहेत. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात येत असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये अवजड वाहने अधिकच अडथळा निर्माण करत असून, अनेक प्रवासी वेळेत पोहोचू शकले नाहीत.दरम्यान, याबाबत वाहनचालक आणि प्रवाशानी चिंता व्यक्त करत अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे वाहतूक कोंडी झाल्याने काही अवजड वाहने बाजूला थांबवून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलावीत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.