मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था पहिल्या पावसातच अत्यंत दयनीय झाली आहे. मोटार चालक आणि प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. मागील दहा वर्षांत या मार्गाच्या कामावर तब्बल 6 हजार कोटी रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोटय़वधी रुपये खर्च करूनही महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे.
मागील सतरा वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्णावस्थेच आहे. खास करून रायगड जिल्ह्यातील बहुतांश रस्ते अर्धवट स्थितीतच आहेत. नागोठणे येथील एका वळणावर या हायवेचे सुरू असलेले काम प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचे ठरत आहे. संपूर्ण रस्त्यावर चिखल झाल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यातील माती सर्वत्र पसरून अपघाताला आमंत्रणच देत आहे.
आतापर्यंत कोटय़वधी रुपये खर्च होऊनही रस्ता सुधारलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी खर्चाचा तपशील माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून मिळवला. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी गेल्या दहा वर्षांत सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुरुस्तीवर कोटय़वधी रुपयांची रक्कम खर्च करूनही दुरुस्ती झालेली दिसत नाही. त्यामुळे झालेला खर्च, कामाचे व्यवस्थापन व दुरुस्तीच्या कामावर ठेवलेली देखरेख यांचे ऑडीट करण्याची गरज व्यक्त होत आहे.