
मराठी माणसाच्या भल्याचा विचार असलेला शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा, अर्थात शिवशक्तीचा वचननामा आज जनतेच्या चरणी सादर करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनात या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईची सर्वांगीण प्रगती साधतानाच मुंबईकरांचा आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्याचा शब्द ठाकरेंनी याद्वारे दिला. घरकाम करणाऱ्या माता-भगिनींची चिंता वाहण्यापासून ते डिजिटल ट्वीनचा कृती आराखडा मांडणारा हा वचननामा म्हणजे ‘मुंबईत ठाकरेच हवेत’ ही जनभावना अधिक दृढ करणारा आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-मनसे आणि राष्ट्रवादीची युती मोठ्या ताकदीने मैदानात उतरली आहे. गेल्या 25 वर्षांत करून दाखवलेली असंख्य कामे दिमतीला असल्यामुळे उमेदवार व कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या विश्वासाला आज ठाकरेंच्या भविष्यवेधी व्हिजनची जोड मिळाली. ‘आम्ही पुन्हा करून दाखवणार’ अशी ग्वाहीच वचननाम्यातून देण्यात आली. या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, मिलिंद कांबळे, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, मनोज चव्हाण उपस्थित होते.
रुग्णालयांची क्षमता दुपटीने वाढवणार
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा मोफत आणि अत्यल्प दरात मिळत असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱयातून रुग्ण या ठिकाणी येतात. त्यामुळे प्रचंड गर्दी होते. यासाठी पालिका रुग्णालयांची रुग्ण हाताळणी क्षमता दुप्पट करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच महापालिकेचे स्वतःचे सुपरस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आर्ट कॉलेज, नाट्यगृहे, कलादालने कलानगरी असलेल्या मुंबईत कलेला प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी कला, फाईन आर्ट्स, सिनेमा तंत्र यांचे शिक्षण दिले जाईल. शिवाय मुंबईत 2031 पर्यंत 10 नवीन मध्यम व छोटय़ा आकाराची नाटय़गृहे, कलादालने उभारली जातील, असे वचन देण्यात आले.
करून दाखवणारच!
1 महापालिकेचं स्वतंत्र गृहनिर्माण प्राधिकरण. पाच वर्षांत मुंबईत 1 लाख परवडणारी घरे.
2 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ. कचरा संकलन कर रद्द करणार.
3 घरकाम करणाऱया महिलांची नोंदणी करून दरमहा दीड हजार रुपये स्वाभिमान निधी देणार.
4 माँसाहेब किचन्स सुरू करणार. कष्टकरी मुंबईकरांना 10 रुपयांत नाश्ता आणि दुपारचं जेवण.
5 मोकळय़ा, मोक्याच्या जागा, महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही.
6 खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास. 5-10-15-20 रुपये तिकीट भाडे. दहा हजार इलेक्ट्रिक बस.
7 बेस्टची वीज वापरणाऱया घरगुती वीज ग्राहकांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज.
8 कोळीवाडे व आदिवासी पाड्यांसाठी समुदाय आधारित स्वयंविकास धोरण आणणार.
9 प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई पर्यावरण कृती आराखडय़ाची कठोर अंमलबजावणी.
10 वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना. कोस्टल रोड, पूर्व किनारपट्टीला जोडणारे रस्ते.
मुंबई शहर नियोजनाचे सर्वाधिकार महापालिकेकडे
मुंबईत विकासकामे करताना अनेक प्राधिकरणांची परवानगी लागते. या प्रक्रियेत वेळ जात असल्याने विकासकामे रखडतात. मुंबईचे आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन ‘ब्लेम गेमचे राजकारण’ कायमचे संपवण्यासाठी मुंबईच्या शहर नियोजनाचे सर्वाधिकार महापालिकेकडे असायला हवेत. त्यासाठी संविधानानुसार अनिवार्य ‘वन सिटी, वन रिस्पॉन्सिबिलिटी आणि वन अकाऊंटिबिलीटी’ धोरणासाठी राज्य व केंद्राकडे पाठपुरावा करणार.



























































