काळ्या यादीतील कंत्राटदार काम करत आहेत का? मीरा-भाईंदरमधील खड्डय़ांवरून हायकोर्टाचा सवाल

मेट्रोच्या कामासह पावसामुळे मीरा-भाईंदरमधील रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याची पुरती वाताहत झाली आहे. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. काळय़ा यादीतील कंत्राटदार अद्यापही काम करत आहेत का, अशी विचारणा वकिलांना करत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर शनिवारी सुनावणी ठेवली.

मीरा-भाईंदरमधील खड्डय़ांच्या प्रश्नावर एमएमआरडीएसोबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही एमएमआरडीएकडून मात्र कोणतीही दखल घेतली जात नसल्याने वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी दाद मागण्यासाठी गो ग्रीन फाऊंडेशन ट्रस्टचे वीरभद्र कोनापुरे यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. रोहन महाडिक यांनी युक्तिवाद केला. त्यांनी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांबद्दल एमएमआरडीएचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी खंडपीठाने काळय़ा यादीतील कंत्राटदार काम करत आहेत का, अशी विचारणा केली त्यावर याचिककर्त्या वकिलांनीही काळय़ा यादीतील कंत्राटदार काम करत असल्याचे न्यायालयाला सांगितले. खंडपीठाने याची दखल घेत यावर शनिवारी सविस्तर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले व सुनावणी तहकूब केली.