चालायला जागा राहिली नाही तर लोकच फेरीवाल्यांना फटकावतील, हायकोर्टाचा गंभीर इशारा

लोकांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका. रीतसर सर्व कर भरणाऱया नागरिकांना त्यांच्याच घरात जायला रस्ता, पदपथावर चालायला जागा राहिली नाही तर एक दिवस लोकच हातात हत्यार घेतील आणि फेरीवाल्यांना फटकावतील, असा गंभीर इशारा उच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

कुलाबा येथील रहिवाशांनी फेरीवाले आमच्या इमारतीसमोरच बसलेले असतात. आम्हाला घरी जाता येत नाही. त्यांना सांगायला गेल्यास ते आम्हालाच धमकावतात, असा अर्ज न्यायालयात केला आहे. त्यावर न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांचे खंडपीठ संतप्त झाले. कुलाबा येथील नागरिकांनी फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्यास पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करून तपास करावा. आरोपी निर्दोष सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे न्यायालयाने पोलिसांना बजावले. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा न्यायालयाने ‘सुओमोटो’ याचिका दाखल करून घेतली आहे. महापालिकेला युक्तिवाद करण्यासाठी वेळ देत न्यायालयाने मूळ याचिकेवरील सुनावणी 19 जून 2025 पर्यंत तहकूब केली.

गोरेगावमध्ये तक्रारदाराच्या गाडीवर हल्ला

गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार करणाऱयाच्या गाडीवर फेरीवाल्यांनी हल्ला केला. पोलिसांनी केवळ एनसी नोंदवून घेतली, अशी माहिती खंडपीठाला देण्यात आली. यावर न्यायालयाने या प्रकरणात कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार याची माहिती उद्या, गुरुवारी पोलिसांनी न्यायालयात सादर करावी, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले.