
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर, शिवाजी पार्क येथील 71 सावरकर सदनाला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा कधी देणार याची माहिती शपथपत्रावर सादर करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला नोटीस धाडली.
न्या. अतुल चांदुरकर व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी होईपर्यंत या वास्तूमध्ये कोणतेही बदल करू नका. ही वास्तू जशी आहे तशीच राहू द्या, असेही न्यायालयाने राज्य शासनासह महापालिकेला बजावले आहे. या वास्तूला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्याच्या मुद्दय़ावर न्यायालयाने पेंद्र सरकारलाही नोटीस धाडली आहे. यावरील पुढील सुनावणी 13 जून 2025 रोजी होणार आहे.
– अभिनव भारत या संघटनेने ही याचिका केली आहे. ऐतिहासिक वास्तूच्या यादीत सावरकर सदानाचा समावेश करून राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्याची विनंती राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेने प्रस्ताव दिलाय
सावरकर सदनाला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्यासाठी महापालिकेने 2010 मध्ये राज्य शासनाला प्रस्ताव दिला आहे. त्यावर सूचना, हरकती मागवण्यात आल्या. पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे ही वास्तू मोडकळीस आली आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानेही नगर विकास खात्याकडे या वास्तूला ऐतिहासिक दर्जा देण्याबाबत विचारणा केली आहे, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
जीना हाऊसला ऐतिहासिक दर्जा
मुंबईतील जीना हाऊसला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र स्वातंत्र्यलढय़ाच्या बैठका झालेल्या सावरकर सदनाचा समावेश या यादीत अद्याप झालेला नाही, याकडेही याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.


























































