हायकोर्टाची सीबीआयला चपराक, 800 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; टाटा इंजिनीअर्सविरोधातील तपासाला स्थगिती

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या (जेएनपीए) एका प्रकल्पात तब्बल 800 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करून टाटा इंजिनीअर्स कन्सल्टिंग (टीसीई) विरोधात सीबीआयने सुरू केलेल्या तपासाला उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली.

या तपासातील शोध व जप्तीत अनेक त्रुटी आहेत, असेही न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या तपासाला स्थगिती देताना नमूद केले. याने सीबीआयला चांगलीच चपराक बसली आहे. यावरील पुढील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार आहे.

काय आहे प्रकरण…

जेएनपीए व मुंबई पोर्टमध्ये मोठय़ा जहाजांना सामावून घेण्यासाठी नेव्हिगेशन चॅनलचा विस्तार केला जाणार होता. दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार होते. या अधिकाऱयांनी गुन्हेगारी कट करून या दोन्ही टप्प्यात तब्बल 800 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता.