मुंबई इंडियन्स जेतेपदाचा षटकार ठोकणार, साखळीतील सलग पाच विजय मुंबईला ठरलेत लकी

आयपीएलमध्ये सर्वप्रथम तीन, चार आणि पाच जेतेपदे जिंकण्याचा पराक्रम मुंबई इंडियन्सनेच केला आहे. आता ते सहाव्यांदा आयपीएलला गवसणी घालतील असे संकेत गुरुवारी विजयाचा षटकार ठोकल्यानंतर मिळू लागलेत. साखळीत सलग पाच सामने जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स आयपीएलच्या ट्रॉफीचेही चुंबन घेते हे दिसून आलेय.

सलग पाच विजय लकी

मुंबई इंडियन्ससाठी सलग पाच विजय आजवर लकी ठरले आहेत. 2013, 2015, 2017 आणि 2020 या चारही स्पर्धांत मुंबई इंडियन्सने सलग पाच आणि त्यापेक्षा अधिक विजय मिळवत जेतेपद पटकावले आहे. त्यानुसार या मोसमात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत नॉनस्टॉप सहा विजय मिळवले आहेत. ही कामगिरी आश्चर्यकारक असली तरी अनपेक्षित नाही. विशेष म्हणजे, पहिल्या पाचपैकी चार सामन्यांत मुंबई इंडियन्स पराभूत झाली होती; पण त्यानंतर मुंबई इंडियन्सचे गोलंदाज असो किंवा फलंदाज, सारेच विजयाच्या इर्ष्येने मैदानात उतरले आणि त्यांनीच मैदान मारलेय. मुंबईने 2019 साली पटकावलेल्या जेतेपदात ते सातत्यपूर्ण विजय मिळवू शकले नव्हते, तरीही ते चॅम्पियन्स ठरलेत हेसुद्धा विसरून चालणार नाही. तसेच पहिल्याच मोसमात म्हणजे 2008 साली त्यांनी पराभवाच्या चौकारानंतर विजयाचा षटकार ठोकत आपला दबदबा दाखवला होता; पण या स्पर्धेत ते प्ले ऑफही गाठू शकले नाही. त्याचप्रमाणे 2010 च्या स्पर्धेत त्यानी सलग पाच विजयांची कामगिरी करत प्रथमच आयपीएलचे प्ले ऑफ गाठले. मग अंतिम फेरीही गाठली, पण त्यांना जेतेपद गाठता आले नाही. एवढेच नव्हे तर 2011, 2012 आणि 2014 या तीन मोसमांत मुंबईने सलग विजय न मिळवताही प्ले ऑफ गाठले, पण ते एकदाही अंतिम फेरीत पोहोचले नव्हते.

IPL 2025 – आम्ही घाबरणार नाही, पुढचा मोसम आमचाच!

पाचव्या जेतेपदानंतर कामगिरी खालावली

गेले चार मोसम मुंबई इंडियन्सच्या लौकिकास साजेसे नव्हते. 2020 साली पाचवे जेतेपद जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सची कामगिरी इतकी खालावली की, 2021 च्या मोसमात त्यांना प्ले ऑफही गाठता आले नाही. मग 2022 मध्ये त्यांनी दहा पराभवांची लाजिरवाणी कामगिरी केली. या मोसमात ते सलग आठ सामने हरले. ही त्यांची आजवरची सर्वात वाईट कामगिरी होती. मात्र 2023 मध्ये त्यांनी आठ विजयांसह प्ले ऑफ गाठले, पण ते अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. 2024 मध्येही मुंबई इंडियन्सचा संघ खचलेला भासला. हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वाखाली प्रथमच उतरलेला संघ सर्वप्रथम साखळीतून बाद झाला होता. या मोसमातही त्यांना दहा पराभवांची झळ बसली होती.