
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतल्या कोळीवाडे अत्यंत दाटीवाटीने उभे आहेत. मुंबईत त्यांची संख्या मोठी आहे. कोळी बांधवांसाठी मोकळी मैदानेही नाहीत. ही मुंबईतल्या कोळीवाड्यांची मोठी समस्या असून ती सोडवण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. सर्वसामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची याप्रकरणी बैठक घेण्यात येईल आणि कोळीवाड्यांमध्ये मोकळी मैदाने आरक्षित करता येतील का यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन सरकारने मंगळवारी विधान परिषदेत दिले. त्यामुळे मुंबईतले कोळीवाडे आता मोकळा श्वास घेणार असून येथे सरकारकडून मोकळी मैदाने आरक्षित करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येणार आहे.
मुंबईतल्या कोळीवाड्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या कुटुंबांची संख्याही मोठी आहे, परंतु कोळी बांधवांना मासे सुकविण्यासाठी मोकळ्या जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यात अनेक अडथळे येतात. तर दुसरीकडे कोळी बांधवांची कुटुंबे वाढत चालली आहेत. परिणामी ते मोकळ्या जागेत बांधकाम करतात, तर अनेक ठिकाणी अतिक्रमणे होऊन अनेक ठिकाणी बांधकामे उभी राहतात. मुलांना खेळण्यासाठी मोकळी मैदाने मिळत नाहीत अशा अनेक समस्या मुंबईतल्या कोळीवाड्यांना भेडसावत आहेत असे अनेक मुद्दे प्रवीण दरेकर यांनी अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केले. त्यांच्या या मुद्द्यांना पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी उत्तर दिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोळीवाड्यांसाठी डीसीआर अर्थात विकास नियंत्रण नियमावली आणण्याची घोषणा केली होती. हा डीसीआर केव्हा आणणार अशी विचारणाही दरेकर यांनी केली.
कोळीवाड्यांची संख्या झाली 41
मुंबईतल्या कोळीवाड्यांचे महसूल विभागाचे प्रधान सचिव यांनी सीमांकन सुरू केल्याची माहिती जानकर यांनी दिली, मात्र त्यांना सुरुवातीला कोळीवाड्यांच्या संख्येत मोठी तफावत आढळली. मुंबईत 7 तर उपनगरात 17 अशी एकूण 24 कोळीवाड्यांची संख्या होती, परंतु जानकर यांनी पुन्हा सर्वेक्षण केल्यानंतर मुंबईत 12 तर उपनगरात 21 असे एकूण 41 कोळीवाडे असल्याचे समोर आले. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या पुढाकाराने कोळीवाड्यांची ही संख्या समोर आल्याचे जानकर यांनी सांगितले.




























































