मुंबई शहाणी झाली! 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई खरंच शहाणी झाली आहे. प्लॅस्टिकबंदीनंतर मुंबईकरांनी प्लॅस्टिकचा वापर कमी केला. आता दिवाळीतही त्यांनी फटाके फोडण्याचे प्रमाण कमालीचे कमी केल्याचे दिसले. गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच या वर्षी फटाक्यांचा आवाज कमी जाणवला. ध्वनी आणि वायुप्रदूषणात भर घालणाऱया फटाक्यांबाबत झालेल्या जनजागृतीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईकरांची यंदाची दिवाळी ही गेल्या 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी असल्याचे फटाक्यांच्या आवाजाच्या नोंदीवरूनच जाणवेल. रविवार, 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत फटाक्यांच्या आवाजाचा स्तर 112.2 डेसिबल्स इतका नोंदला गेला. तत्पूर्वीच्या वर्षांमध्ये फटाक्यांच्या आवाजांनी डेसिबल्सची पातळीच ओलांडली होती. फटाक्यांचा आवाज 145 डेसिबल्सपेक्षाही जास्त नोंदला गेला होता.

मुंबईतील हवाही चांगली
केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱया ‘सफर’ या संस्थेने सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी मुंबईतील हवेच्या दर्जाची नोंद केली. तो 87 इतका म्हणजे समाधानकारक नोंदला गेला. हवेचा दर्जा नोंद करताना तो पुढीलप्रमाणे केला जातो. 0 ते 50 – चांगला, 50 ते 100 – समाधानकारक, 100 ते 200 – मध्यम, 200 ते 300 – खराब किंवा प्रदूषित, 300 ते 400 – अत्यंत खराब किंवा हानीकारक.

दिवाळीमध्ये मुंबईत मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होत होती. काही वर्षांपासून चिनी बनावटीच्या फटाक्यांनी मुंबईकरांवर मोहिनी घातली होती. मोठा आवाज आणि तितकाच मोठा झगमगाट करणाऱया चिनी फटाक्यांना मागणीही चांगली होती. या वर्षी मात्र मुंबईकरांनी या फटाक्यांपासून थोडी फारकतच घेतल्याचे दिसून आले.