
पश्चिम रेल्वे आजपासून 700 लोकल फेऱ्य़ा चालविणार असताना मध्य रेल्वेनेही 28 अतिरिक्त लोकल फेऱ्य़ा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील अत्यावश्यक कर्मचाऱ्य़ांसाठी चालविण्यात येणाऱ्य़ा एकूण फेऱ्य़ांची संख्या आता 453 वरून उद्यापासून 481 होणार आहे. तसेच मध्य रेल्वे आणखीन 219 फेऱ्य़ा वाढविण्यासाठी वेळापत्रकात बदल करणार असून मध्य रेल्वेच्याही एकूण फेऱ्य़ांची संख्या लवकरच पश्चिम रेल्वेप्रमाणे 700 इतकी होणार आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलची दारे सर्वसामान्य प्रवाशांना बंदच असून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी 15 जूनपासून लोकल लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने 10 एसी लोकल फेऱ्य़ांसह 194 नव्या फेऱ्य़ांची भर वेळापत्रकात केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या फेऱ्य़ांची संख्या उद्यापासून 506 वरून 700 इतकी होणार आहे. अनलॉक सुरू करताना टप्प्या टप्प्याने नव्या घटकांना लोकल प्रवासाची अनुमती दिल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखण्यासह गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने टप्प्या टप्प्याने आपल्या फेऱ्य़ांमध्ये वाढ केली आहे.























































