
उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर स्टंटबाजांचा उपद्रव कायम आहे. धावत्या लोकल ट्रेनमध्ये स्टंट करणाऱया प्रवाशांवर आरपीएफने कारवाईचा दंडुका उगारला आहे. मध्य रेल्वे मार्गावर मागील वर्षभरात नऊ स्टंटबाजांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या अटकेची कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र वर्षभरात स्टंटच्या केवळ एका गुह्याची नोंद झाली. आरपीएफने ही कारवाई सुरू ठेवत मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
गेल्या काही वर्षांत लोकल ट्रेनच्या छतावर चढून प्रवास करण्याचे प्रकार बंद झाले आहेत. मात्र धावत्या लोकलमध्ये स्टंट करण्याचे सत्र मध्य आणि हार्बर मार्गावर सुरूच आहे. नियमित प्रवाशांना अशा स्टंटबाजांचा धोका निर्माण होत आहे. असे प्रकार निदर्शनास येताच दक्ष प्रवासी त्याचे व्हिडीओ रेल्वेच्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करतात. त्याआधारे आरपीएफकडून स्टंटबाजांवर कारवाई केली जात आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर आरपीएफने लोकल ट्रेनमधील स्टंटबाजीला चांगलाच लगाम लावला आहे. गेल्या वर्षभरात धावत्या ट्रेनमध्ये स्टंट केल्या प्रकरणी नालासोपारा येथे केवळ एक गुन्हा नोंद झाला. दोन व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर टीक-टॉकसाठी रेल्वे ओलांडण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही आणि गोपनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारे त्या स्टंट करणाऱया दोघांना पकडण्यात आले. नंतर वसई न्यायालयाने त्यांना प्रत्येकी 1 हजारांचा दंड ठोठावला.
वडाळा ते मानखुर्द भागात स्टंटचे प्रमाण अधिक
हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द भागात स्टंट करण्याचे प्रमाण अधिक आहे. आरपीएफने जुलै 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत मध्य रेल्वेवर नऊ स्टंटबाजांवर कारवाई केली. वडाळा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, मानखुर्द आदी भागांत आरपीएफने स्टंटबाजांना अटक केली. व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून ही कारवाई केली.