
उपनगरीय लोकल सेवेला मुंबईची लाइफलाइन म्हटले जाते. कारण लोकल धावली नाही तर शहर ठप्प होते. स्वप्नाचे शहर मुंबईला जागे ठेवण्याचे काम आपली लोकलच करते. याचे उदाहरण म्हणजे मध्य रेल्वेची शेवटची लोकल कर्जतला पोहचण्याआधीच तेथून मुंबईला पहिली लोकल निघालेली असते.
मध्य रेल्वेवर सध्या दररोज 1774 लोकल फेऱया चालविण्यात येतात, तर पश्चिम रेल्वेवर 1367 फेऱया चालविण्यात येतात. अशा दररोज 3,141 फेऱ्यातून जवळपास 80 लाख मुंबईकर प्रवास करतात. ‘परे’चा मार्ग सरळसोट असून ‘मरे’चा मार्ग मात्र सर्वात जुना असून ‘ऑक्टोपस’च्या हातांप्रमाणे विविध फाटे फुटलेला आहे. मध्य रेल्वेचे वेळापत्रक आधीच गच्च भरलेले असल्याने एकाही नव्या फेरीला सध्या जागा नसल्याने प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेची मध्य रेल्वेला प्रचंड प्रतीक्षा आहे. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी स्वंतत्र कॉरिडॉर उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेला रात्रीच्या मेंटेनन्ससाठी वेळच मिळत नसल्याने काही वर्षांपूर्वी रात्री शेवटी सुटणाऱया गाडीची वेळ आणखी आठ मिनिटांनी कमी करण्यात आली होती.
आता सीएसएमटीतून शेवटची लोकल (कुर्ला) मध्यरात्री 12.31 वाजता सुटते, तर शेवटची कर्जत मध्यरात्री 12.25 वाजता सुटते आणि शंभर किलोमीटरचे आणि 2 तास 20 मिनिटांचे अंतर कापत ही ट्रेन मध्यरात्री 2.45 वाजता कर्जत गाठते. परंतु आश्चर्य म्हणजे ही ट्रेन पोहचण्याआधीच मध्यरात्री 2.35 वाजता कर्जतहून मुंबईकडे पहिली लोकल आपल्या प्रवासाला निघते. ही ट्रेन पहाटे पाच वाजता सीएसएमटीला पोहचते. नव्या वेळापत्रकात आता सीएसएमटीला सकाळी सातच्या पाळीला जाणाऱया कामगारांच्या मागणीवरून कसारा येथून सकाळी सुटणारी पहिली लोकल पहाटे 4.25 ऐवजी आता 34 मिनिटे आधी म्हणजे 3.51 वाजता सोडण्यात आली आहे.
लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये वारंवार सुरक्षा साखळी खेचण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच ट्रेस पासिंगच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होत असतो. रेल्वे फाटकांना बंद करण्यासाठी संबंधित महापालिका आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पहाटे आणि रात्री उशिरापर्यंत सेवा पुरविण्यात येत आहे. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
मध्य रेल्वेची शंकर-नारायण जोडी
मध्य रेल्वेचे कल्याणपासून पुन्हा दोन फाटे फुटतात. एक कर्जतला खोपोलीमार्गे पुण्याला जातो, तर दुसरा कसारा दिशेने इगतपुरीला जातो. कर्जतचा मार्ग दक्षिण-पूर्व ते कसारा मार्गाला उत्तर-पूर्व म्हटले जाते. त्यामुळे कर्जत आणि कसारा अशा दोन दिशांच्या मार्गांच्या आद्याक्षराने कर्जत लोकलला ‘साऊथ’चे अद्याक्षर ‘एस’वरून ‘शंकर’ म्हटले जाते. तर कसारा लाइन नॉर्थला असल्याने कसारा लोकलला ‘नारायण’ असे टोपणनाव ठेवले आहे. कर्जत आणि कसारा दोन्ही ‘क’ अक्षराने सुरू होतात. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण दिशेचा मार्ग वेगळा ओळखता यावा म्हणून ही सांकेतिक नावे ठेवण्यात आल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
वर्ष रोजच्या एका डब्यातील रोजचे प्रवासी
फेऱ्या प्रवासी (लाखात)
- 1951 492 103 3.01
- 1961 520 107 4.02
- 1971 606 123 5.97
- 1981 862 192 13.23
- 1991 1023 254 23.47
- 2001 1094 267 27.49
- 2011 1573 226 37.41






























































