
मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शुक्रवारपासून मुंबईच्या आकाशात ढगांची गर्दी झालेली दिसत असून काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. याचा परिणाम मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेवर झाला आहे.
पावसाची रिपरिप सुरू असल्याने अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या वेळेपेक्षा उशिरा धावत असून यामुळे प्रवाशांना मनस्ताप झाला. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल साधारण 15 मिनिटे ते एक तास उशिराने धावत असल्याने सकाळच्या सुमारास कार्यालयीन कामकाजासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना लेटमार्क मिळाला.
मुसळधार पावसाने रेल्वे रुळांवर साचले पाणी, लोकल सेवा कोलमडली; वाहतूक धीम्या गतीने सुरू
व्हिडीओ- गणेश पुराणिक#HeavyRain pic.twitter.com/2FvRwD0e6B— Saamana Online (@SaamanaOnline) August 16, 2025
मुंबईत शुक्रवार रात्रीपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. हवामान विभागाने मुंबईला आज रेड अलर्ट जारी केला असून सतत कोसळणाऱ्या पावसाचा थेट परिणाम लोकल सेवेवर झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. अनेक लोकल अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत आहेत, तर काही ट्रॅकवर थांबल्या. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर चालत जाऊन जवळचे स्थानक गाठले.

हार्बर मार्गावरून पनवेल स्थानकावरून 5.40 वाजता सुटणारी पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल रखडली आहे. मानखुर्द स्थानकापासून गाडी धीम्या गतीने मध्ये थांबत थांबत पुढे सरकत आहे. नेहमी 6.30 च्या आसपास कुर्ला स्थानकाला पोहोचणारी ही गाडी आज तब्बल एक तास उशिराने कुर्ला स्थानकावर पोहोचली. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
