दुकाने सुरु, मात्र ग्राहकांनी फिरवली पाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने सुरू असलेल्या लॉकडाऊन मधून शुक्रवारी म्हणजेच 5 जूनपासून सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली. मात्र मोठ्या उत्साहाने दुकाने सुरू करूनही ग्राहकांनी दुकानांकडे पाठ फिरवली. दुकानदार आणि सेल्समन तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्हज घालून हसतमुखाने स्वागतासाठी तयार होते. सोशल डिस्टंसिंग पाळले जावेत यासाठी दुकानाबाहेर चौकोन आखले गेले, पण दुकानांकडे दिवसभर ग्राहक फिरकले नाहीत.

मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे तसेच मॉल आणि व्यापारी संकुले वगळून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे दुकानदारांमध्ये मोठा उत्साह होता. सम आणि विषम नियम पाळून मोजकीच दुकाने उघडण्यात आली. मात्र सर्वसामान्य ग्राहकांमध्ये निरुत्साह जाणवला. जी उत्तर विभागातील दादर, माहीम आणि धारावी ही प्रतिबंधित क्षेत्र वगळून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार पूर्व आणि दक्षिणेकडील दुकाने तर मंगळवार गुरुवार आणि शनिवारी पश्चिम आणि उत्तरेकडे दुकाने सुरू राहतील. किराणामाल औषधे आणि दूध विक्रीची दुकाने सोडून इतर दुकाने रविवारी बंद राहणार आहेत असे आदेश जी उत्तर चे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिले. दुकाने उघडल्यामुळे त्याचा फायदा किरकोळ व्यापाऱ्यांना होणार आहे तर ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंसह इतरही वस्तू बाजारात जाऊन खरेदी करता येणार आहेत..

सकाळपासून ढगाळ वातावरण
मुंबईत शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते त्याचा परिणाम आणि ग्राहकांवर झाला. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याचा वारा आणि पावसाचा दणका मुंबईकरांना बसला होता त्यामुळे शुक्रवारी असलेले ढगाळ वातावरण बघून ग्राहक दुकानांकडे फिरकलेच नाहीत.

संध्याकाळी दुकाने लवकर बंद
कोरोना पार्श्वभूमीवर रात्री आठ नंतर सुरू करण्यात आलेली संचारबंदी कायम आहे. त्यामुळे संध्याकाळी आठच्या आत दुकानातील कर्मचारी घरी पोहोचावेत यासाठी काही दुकाने पाच वाजताच बंद करण्यात आली. त्यामुळे संध्याकाळी बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना दुकाने बंद आढळली.