
मलबार हिल टेकडी आणि परिसरातील रस्त्यांच्या मजबुतीसाठी ‘आयआयटी’च्या तंत्रज्ञानाने काम केले जाणार आहे. यामध्ये टेकडीच्या सुरक्षेसाठी मातीत स्टीलचे रॉड टापून ‘नेल टेक्नॉलॉजी’, धातूची जाळी टाकून काम केले जणार आहे. या कामासाठी पालिका 50 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. पावसाळय़ाआधी हे काम पूर्ण केले जाणार आहे.
दक्षिण मुंबईत ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत मलबाह हिल टेकडीचा मोठा भाग खचला होता. हँगिंग गार्डनच्या लगत असलेल्या एन. एस. पाटकर मार्गापासून ही टेकडी खचल्याने माती, झाडांचा ढिगारा थेट बी. जी. खेर मार्गावर आला होता. पावसाच्या जोरामुळे टेकडीच्या पायथ्याशी असणाऱया पारसी वसाहतीतील काही इमारतींचेही नुकसानही झाले होते. त्यामुळे या भागात एकेरी वाहतूक ठेवून तात्पुरते सुरक्षेचे काम करण्यात आले होते. मात्र या भागात मोठय़ा प्रमाणात रहदारी, वाहतूक आणि लोकवस्ती असल्यामुळे पालिकेने संपूर्ण विभागातील भिंतीची आणि रस्त्यांची मजबुती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम दर्जेदार करण्यासाठी मुंबई ‘आयआयटी’चे प्राध्यापक डी. एन. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. आठ जणांच्या या तज्ञ समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता पालिकेने कामासाठी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘नेल टेक्नॉलॉजी’ने टेकडी मजबूत केली जाणार असून बी. जी. खेर मार्ग आणि एन. एस. पाटकर मार्गाची दुरुस्ती केली जाणार आहे. हे काम आणि आणि सल्लागार शुल्कासह पालिका 50 कोटी 49 लाख रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.
पाच वर्षे जबाबदारी कंत्राटदाराची
मलबार हिल टेकडी मजबुतीचे काम करणाऱया कंत्राटदारावर पुढील पाच वर्षे संबंधित कामाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी राहणार आहे. काँक्रिटची संरक्षक भिंत, उतार स्थिरीकरण, माती नेलिंग अशी कामे कंत्राटदाराला करावी लागणार आहेत. शिवाय सॉईल नेलिंग करणे, पूर्वीच्या दगडी संरक्षक भिंतीच्या जागी काँक्रीटची भिंती उभारणे, केपम्स कॉर्नर पुलावरील भार कमी करून डांबरीकरण करणे, एन.एस पाटकर, बी.जे. खेर मार्गाची दुरुस्ती करणे अशी कामे केली जाणार आहेत. पाच वर्षांत या कामात काही दोष निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे.
























































