आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक

345

आखाती देशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ असे आमिष दाखवून व्हिसा, विमानाचे तिकीट आदीच्या नावाखाली बेरोजगारांना हजारो रुपयांचा चुना लावणाऱ्या दोघा भामट्यांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्या भामट्यांनी थाटलेल्या कार्यालयातून संगणक, प्रिंटर, 79 पासपोर्ट, अनेकांच्या व्हिसाचे फोटोप्रिंट, रबरी शिक्के आदी साहित्य जप्त केले आहे.

धारावीत राहणारा जाहिद कासीम खान (37) या तरुणाची आखाती देशात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाली होती. त्यामुळे त्याने पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखा युनिट-1 चे प्रभारी पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्यासह पोलीस निरीक्षक महेश तावडे व पथकाने गुन्ह्याचा लगेच समांतर तपास सुरू केला. तेव्हा मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाशेजारी पटवा चेंबर्समध्ये एका टोळीने कार्यालय थाटले असून तेथून ते परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांची फसवणूक करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार मेर, तावडे व पथकाने त्या ठिकाणी धडक देउâन अक्रम शरीफ शेख (४७) आणि मोहम्मद शाबीर अकबर मास्टर उर्फ मुन्ना (52) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अनेकांना नोकरीच्या नावे चुना लावल्याची कबुली दिली.

परराज्यातही कार्यालये

आरोपींचा एक साथीदार परराज्यात असून लवकरच त्यालाही पोलीस बेड्या ठोकणार आहेत. या भामट्यांनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात, ओडिशा आदी राज्यांत अशा प्रकारे कार्यालये थाटून अनेक बेरोजगारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या