
मराठी भाषेचा अभिमान आणि भाषिक अस्मितेला नवी उभारी देणार्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कवितोत्सवाला शुक्रवारी उत्साही प्रतिसाद मिळाला. यावेळी, ‘मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी शपथ घेतली पाहिजे. आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीतच बोलले पाहिजे, मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे.’ या कविवर्य अशोक नायगावकर यांच्या कळकळीच्या आवाहनाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दुजोरा दिला.
या कविसंमेलनात नायगावकर यांच्यासह अरुण म्हात्रे, महेश केळुसकर आणि प्रथमेश पाठक, संदीप राऊत, संकेत म्हात्रे असे अनेक युवा नामवंत कवी सहभागी झाले होते. त्यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कवितांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. मराठी भाषेची गोडी, तिची परंपरा आणि समकालीन वास्तव यांचे विविध पैलू या कवींनी कवितांमधून उलगडले.
या कविसंमेलनात संघाचे माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, सदस्य सदानंद खोपकर, सदस्य मंगेश मोरे, सदस्य सतीश केंगार आणि सदस्य डॉ. उषाराणी गुजराथी यांनी आपल्या कविता सादर करत मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त केले. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेला कविता, विचार आणि भाषाप्रेमाचा संगम असलेला हा कवितोत्सव संस्मरणीय ठरला. मराठीची समृद्ध परंपरा जपण्याचा आणि पुढील पिढीपर्यंत ती अभिमानाने पोहोचवण्याचा निर्धार या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला.


























































