
सामना ऑनलाईन,मुंबई
माटुंगा पश्चिम येथील बिग बझारला आज सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. लोकसभा निवडणूक मतदानाच्या सुट्टीमुळे आज बिग बझार बंद असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र या आगीत रोकड, हिशेबाची कागदपत्रे आणि मोठय़ा प्रमाणावर सामानाचा कोळसा झाला. या आगीत कुणीही जखमी झाले नसले तरी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून शोधमोहीम आणि कूलिंग ऑपरेशन सुरू होते.
माटुंग्यात रेल्वे स्टेशनजवळच आणि मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या बिग बझारमध्ये दररोज मोठय़ा संख्येने ग्राहक येत असतात. सायंकाळी तर ग्राहकांची गर्दी आणखी वाढते. मात्र मतदानाच्या सुट्टीमुळे आज दुकान सकाळपासून बंद ठेवण्यात आले होते. मात्र सायंकाळी 5 वाजता बिग बझार ग्राहकांसाठी खुला करण्यात येणार होता. त्यामुळे दुपारी 4 वाजल्यापासून कर्मचारी येण्यास सुरुवातही झाली होती. काही ग्राहक बिग बझार उघडण्याची वाट बघत बाहेर उभे होते. मात्र सायंकाळी 5.7 वाजताच्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ताबडतोब बाहेर धाव घेतली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. आगीची माहिती मिळताच 8 फायर इंजिन, 7 पाण्याचे टँकर यांच्यासह अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. आग इतकी भीषण होती की सुरुवातीलाच लेव्हल-3ची असल्याचे जाहीर करण्यात आले. तर आग आणखीच भडकत गेल्याने रात्री 8च्या सुमारास लेव्हल-4ची आग असल्याचे जाहीर करण्यात आले.
बेकायदा गोडाऊनमुळे बचावकार्यात अडथळे
बिग बझार आणि लगतच्या ‘पाम हाऊस’ इमारतीला लागून सुमारे 15 फुटांची सामायिक भिंत आहे. या भिंतीला लागून दुकान मालकाने बेकायदेशीरपणे दुकाने आणि माल साठवल्याचा आरोप शेजारील रहिवाशांनी केला. या दुकांनांसाठी लावलेल्या पत्र्यांमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला प्रचंड अडचणी आल्या. अखेर रात्री 9च्या सुमारास भिंत तोडून सुमारास आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले.
जळालेल्या सामानाचा दुर्गंध आणि स्फोटांमुळे रहिवाशांमध्ये घबराट
मोठय़ा प्रमाणात ग्राहक येत असल्यामुळे या एक मजल्याच्या बिग बझार दुकानात मोठय़ा प्रमाणावर सामान साठवून ठेवण्यात आले होते. यात तेल, कपडे, प्लॅस्टिक-इलेक्ट्रिक साहित्यही असल्यामुळे 5च्या सुमारास लागलेली आग रात्री 9पर्यंत धुमसत होती. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न करूनही आग भडकत असल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात धूर आणि जळालेल्या सामानाचा दुर्गंध पसरला होता. त्यामुळे सभोवतालच्या रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. लागून असलेली पाम हाऊस इमारत तातडीने संपूर्ण रिकामी करण्यात आली. बिग बझारचा मालक रहिवाशांची विचारपूसही करण्यास आली नसल्याने प्रचंड संताप व्यक्त केला.






























































