पडलेली झाडे, गाळ तात्काळ काढा! बीबीडी चाळ, ना. म. जोशी मार्गाची महापौरांकडून पाहणी

596

मुंबईत बुधवारी झालेल्या वादळी वार्‍यासह मुसळधार पावसामुळे उन्मळून पडलेली झाडे आणि सखल भागांतील पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये जमा झालेला गाळ तात्काळ काढा, असे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. महापौरांनी आज वरळी बीबीडी चाळ आणि ना. म. जोशी मार्गावरील परिसराची पहाणी करून आढावा घेतला.

मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. बुधवारी मुसळधार पावसाबरोबर वादळी वार्‍यानेही मुंबईला मोठा तडाखा दिला. त्यामुळे मुंबईतील शेकडो झाडे उन्मळून पडली. त्या पार्श्वभूमीवर, महापौरांनी जी/दक्षिण विभागातील पाणी साचलेल्या सखल भागांतील वरळी बीडीडी चाळ तसेच ना. म. जोशी मार्गावरील परिसराची पाहणी केली आणि रहिवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी कोसळलेले वृक्ष तातडीने हटवावेत तसेच त्या ठिकाणी नवीन झाडे लावावीत, असे निर्देशही महापौरांनी संबंधित पालिका अधिकार्‍यांना दिले.

त्यासोबतच ज्या सखल भागांमध्ये पाणी साचले होते त्या परिसराची पाहणी करून रुतून बसलेला पर्जन्य जलवाहिन्यांमधील गाळ काढण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी नगरसेविका स्नेहल आंबेकर, जी/दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे तसेच परिरक्षण, पर्जन्य, घनकचरा, कीटकनियंत्रण, उद्यान, पाणीपुरवठा खाते यांच्याशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या