
भूमिगत मेट्रोची आरे जेव्हीएलआर ते कफ परेड ही मार्गिका गुरुवारी प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुली झाली आणि पहिल्याच दिवशी हजारो मुंबईकरांनी भूमिगत मेट्रो प्रवासाकडे मोर्चा वळवला. मात्र स्कॅनरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांची तारांबळ, पाच मिनिटांच्या प्रवासासाठी दहा मिनिटांचे वेटिंग आणि मार्गिकेत गायब झालेले नेटवर्क यामुळे प्रवाशांना पहिल्याच दिवशी कही खुशी कही गम असाच अनुभव आला. शिवाय जादाचे तिकीटदर यामुळे नाराजी व्यक्त केली.
भूमिगत मेट्रो मार्गिकेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड अशी प्रमुख स्थानके आहेत. प्रशासकीय कामांसाठी दररोज दक्षिण मुंबईला जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यासाठी भूमिगत मेट्रो मार्गिका सोयीची ठरणार आहे. तसे चित्र गुरुवारी सकाळपासून भूमिगत मेट्रोच्या दक्षिण मुंबईतील स्थानकांमध्ये दिसून आले. तिकीट काऊंटरवर लांबलचक रांगा लागल्या. यात नोकरदारांबरोबर कुटुंबीयांसोबत मेट्रो सफरचा आनंद लुटणाऱ्या मुंबईकरांचीही संख्या अधिक होती. सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 97,846 मुंबईकरांनी मेट्रोतून प्रवास केला. आकर्षण म्हणून प्रवास केलेल्या मुंबईकरांनी गारेगार प्रवासावर समाधान व्यक्त केले. मात्र नियमित प्रवास करू पाहणाऱ्या सामान्य नोकरदारांनी जास्तीच्या तिकीट दरावर नाराजी व्यक्त केली.
स्थानकांच्या परिसरात मोबाईल नेटवर्कची बोंब
भूमिगत मेट्रो स्थानकांच्या परिसरात तसेच संपूर्ण मार्गिकेवर मोबाईल नेटवर्कची समस्या कायम आहे. मेट्रोच्या आधीच्या दोन टप्प्यांमध्ये हाच प्रश्न होता. त्यावर तोडगा काढण्यासंदर्भात प्रवाशांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली. मात्र मेट्रो प्रशासनाला मोबाईल नेटवर्क समस्या सोडवण्यात अद्याप यश आलेले नाही.
एण्ट्री पॉइंटवर तांत्रिक बिघाड
अनेक मेट्रो स्थानकांच्या एण्ट्री पॉइंटवर तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ उडाला. कित्येक मशिनवर स्कॅनर चालत नव्हते. त्यात नवीन कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची धांदल उडाली. गिरगाव मेट्रो स्थानकात कर्मचारी उशिरा आल्याने गिरगावकरांचा पहिल्या मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद हुकला. स्थानकात काही ठिकाणी डासांचा वावर दिसल्याने प्रवाशांनी स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले.