गणेशोत्सवादरम्यान रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली असते. हे लक्षात घेता महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री 11 ऐवजी रात्री 11.30 वाजता सुटेल.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ 30 मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री 11.15 आणि 11.30 वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरू केल्या जातील. या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण 20 अतिरिक्त फेया चालवल्या जातील. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहोचता यावे हा या विस्तारित सेवेचा उद्देश आहे.
मेट्रो वनदेखील उशिरापर्यंत धावणार
गणेशोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मेट्रो वनने देखील 7 ते 17 सप्टेंबर या कालावधीत वर्सेवा-घाटकोपर सेवेचे कामकाजाचे तास वाढवण्याची घोषणा केली. वर्सेव्याहून शेवटची मुंबई मेट्रो ट्रेन रात्री 11.20 ऐवजी 12.10 वाजता घाटकोपरला रवाना होईल. घाटकोपरहून वर्सेव्याला जाणारी अंतिम मुंबई मेट्रो ट्रेन रात्री 11.45 ऐवजी 12.40 वाजता सुटेल.