
मुंबई मेट्रो टप्पा–3 वरील जेव्हीएलआर ते कफ परेड मार्गावरील भुयारी मेट्रो रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्याही लवकरच वाढण्याची चिन्हे आहेत. पण भुयारी मार्गातील प्रवासात मोबाईल फोन सेवा पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मात्र प्रवाशांना लवकरच इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
मुंबई मेट्रो रेल्वे टप्पा-3 (अॅक्वालाईन) या मार्गावरील वरळी ते कफ परेड या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन आठवडय़ांपूर्वी झाले. त्यानंतर जेव्हीएलआर ते कफ परेड हा 33.5 किमी लांबीचा मेट्रो रेल्वेचा मार्ग प्रवाशांसाठी पूर्णपणे खुला झाला. या मार्गावर 27 मेट्रो स्टेशन आहेत. सर्व महत्त्वाच्या व्यावसायिक भागातून हा मेट्रो मार्ग जात असल्याने हा मार्ग प्रवाशांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र इंटरनेट नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
‘ऑप्टिकल’वर मेट्रो रेल्वेचा 100 कोटींचा खर्च
भुयारी मार्गातील प्रवासात प्रवाशांना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने ऑप्टिकल फायबर जाळय़ासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च केला आहे. पण या मार्गावरील सेवा पुरवठादाराने या मार्गावर स्वतःची फायबर लाईन टाकण्याची परवानगी देण्याची मागणी मेट्रो रेल्वेकडे केली आहे.

























































