मेट्रो मार्गावरील धारावी स्टेशनचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

मुंबई मेट्रो टप्पा तीनच्या सीप्झ ते कुलाबा मार्गावरील धारावी स्टेशनच्या उभारणीसाठी धारावीतील 0. 43 हेक्टर जमीन कांदळवनातून वगळण्यात आली आहे. त्यामुळे धारावी स्टेशनचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई मेट्रो तीन हा मार्ग कुलाबा- वांद्रे-सीप्झ यांना जोडणारी असून पूर्णपणे भुयारी आहे. या मार्गात एकूण 27 स्टेशन असतील त्यातील 26 स्टेशन भुयारी आहे. प्रत्यक्ष मार्ग 33. 5 किमीचा असला तरी या प्रकल्पासासाठी 51 किमीचा भुयारी मार्ग खोदला जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल्वे काँर्पेरेशन हे काम करीत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारची समान भागिदारी असलेली मुंबई मेट्रो रेल्वे काँर्पेरेशन ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या मेट्रोमुळे फोर्ट, वरळी, बीकेसी, मरोळ एमआयडीसी, विमानतळ, फोर्ट व कलिनामधील मुंबई विद्यापीठाचे संकुल, दहा ते बारा मोठय़ा शैक्षणिक संस्था, हाँस्पिटल, धार्मिकस्थळे मेट्रोमुळे जोडली जातील. मात्र या मार्गावरील धारावीतील काही जमीन कांदळवन म्हणून आरक्षित करण्यात आली होती. त्यामुळे धारावी स्टेशनच्या उभारणीमध्ये अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या स्टेशनच्या मागणीसाठी धारावीतील 0.34 हेक्टर कांदळवन जमीन वगळण्याची मागणी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पेरेशनने अप्प मुख्य प्रधान वनसंरक्षकांकडे केली होती. पण हा विषय केंद्रीय पर्यावरण वन व जलवायु परिवर्तन मंत्रालयाच्या अखत्यारित असल्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर केंद्र सरकारने स्टेशनसाठी आवश्यक जमीन कांदळवन क्षेत्रातून वगळण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे धारावी स्टेशनच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही जमीन कांदळवन क्षेत्रातून वगळण्यात आल्याचे राज्याच्या महसूल व वन विभागाने शासन आदेश प्रसिद्ध करून जाहीर केले आहे.