महापालिका ‘शिक्षणा’चा कायापालट होणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

पालिका शिक्षण विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी थर्ड पार्टी ऑडिट करून कायापालट केला जाणार आहे. पालिकेच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाबाबत मंगळवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नॅशनल ऑक्रिडेशन बोर्ड ऑफ एज्युकेशन ऍण्ड ट्रेनिंग (नाबेट) संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमात प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या 30 शाळांचे व्यवस्थापन, सुविधा, सुरक्षितता आणि शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून शिक्षणाचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना 27 वस्तू मोफत दिल्या जात असून ‘बेस्ट’ बस पास, व्हर्च्युअल क्लासरूम-टॅबच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. शिवाय नव्या शाळांची बांधणी-शाळांच्या दुरुस्तीची कामेही केली जात आहेत. असे असले तरी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आणखी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण पद्धतीत आवश्यक असणारे बदल करण्यासाठी थर्ड पार्टीकडून ऑडिट करून आवश्यक सुधारणा करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली होती.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून होणाऱया या उपक्रमाचे उद्घाटन अंधेरी पूर्व वेरावली महापालिका शाळेत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नगरसेवक अनंत (बाळा) नर, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे आर. पी. सिंग, मधू अलुवालिया, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, राहुल कनाल, शिक्षणाधिकारी महेश पालकर, सहआयुक्त आशुतोष सलील, अनिल त्रिंबककर आदी उपस्थित होते.

पालिका शाळांत प्रवेशासाठी रांगा लागल्या पाहिजेत

पालिका शाळांचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे लवकरच पालिका शाळांमध्ये आणखी दर्जेदार शिक्षण मिळेल. येत्या पाच वर्षांत पालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांच्या रांगा लागल्या पाहिजेत इतकी गुणवत्ता या उपक्रमामुळे निर्माण होईल, असा आशावाद आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला, तर या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन चांगले नागरिक बनण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

ऑक्टोबरपर्यंत अहवाल

या उपक्रमात शाळांचे मूल्यमापन करण्यात येणार असून यामध्ये शिकवण्याच्या पद्धती, विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीचाही अभ्यास केला जाणार आहे. ही संस्था ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल पालिकेला सादर करेल, असे शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक म्हणाल्या. अहवाल येताच पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.