कंत्राटदाराच्या फायद्यासाठी महापालिका आयुक्तांनी मुंबादेवीचे मंदिरच झाकले, विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबईची कुलस्वामिनी असलेल्या मुंबादेवी मंदिरासमोरच मुंबई महानगरपालिका बहुमजली पार्किंग उभारत आहे. या पार्किंगमुळे मुंबादेवी मंदिर झाकले जाणार आहे. त्यामुळे पार्किंगचे बांधकाम तातडीने थांबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी दिले होते, मात्र कंत्राटदाराच्या फायद्यासाठी महापालिका आयुक्तांच्या सूचनेने अधिकाऱयांनी ते तसेच सुरू ठेवले आहे. या मुद्दय़ावरून आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. असे असताना तेथे पूर्वी पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचे काम मुंबई पालिकेने हाती घेतले आहे. यामुळे मुंबादेवी मंदिराचा दर्शनी भाग झाकला जाणार असल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट देत तत्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले. विधानसभेत याआधी हा विषय चर्चेला आला असता अध्यक्ष नार्वेकर यांनी काम तत्काळ थांबण्याचे आदेश दिले होते, मात्र काम आजही सुरू आहे, याकडे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे लक्ष वेधले होते.

अधिकाऱयांवर कठोर कारवाई करा – राहुल नार्वेकर

याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासंदर्भात उच्च स्तरावर निर्णय होत नाही तोपर्यंत हे काम थांबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेले होते. असे असतानाही संबंधित अधिकाऱयांनी, महापालिकेच्या आयुक्तांनी काम सुरू ठेवले. या सभागृहाने दिलेले निर्देश त्यांना कमी वाटत असतील तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी. विकास आराखडय़ात संबंधित जागेवर पार्किंगसाठी जागा दाखवलेली नाही. याचा अर्थ एखाद्या कंत्राटदाराचा फायदा करून देण्यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करीत असतील तर त्यांच्यावर सक्त कारवाई होणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. संबंधित विभागाला याबाबत माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले जातील आणि त्याचा अहवाल सभागृहात सादर केला जाईल, असे त्यावर सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहाला सांगितले.