पवई तलाव होणार स्वच्छ, सुंदर, सांडपाणी इतरत्र वळवणार; पर्यावरण, जैव विविधता संवर्धनासाठी निर्णय

पवई तलावाच्या पर्यावरण आणि जैव विविधता संवर्धनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी इतरत्र वळवणे आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्वतंत्रपणे दोन निविदा काढण्यात आल्या असून याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर पाण्यातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचा वेगही वाढवण्यात येणार आहे.

मुंबई विकसित होत असताना पवई जलाशयातून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र त्यानंतर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची संख्या वाढल्यानंतर तसेच पवई तलावातील प्रदूषण वाढल्यामुळे या तलावातून केला जाणार पाणीपुरवठा गेल्या काही वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. पवई तलावात गेल्या काही दिवसांत जलपर्णी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर पवई तलावातील सांडपाण्याचा निचरा रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) खात्यामार्फत दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मलनिस्सारण वाहिनी अंथरणे आणि 8 दशलक्ष लिटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे या दोन कामांचा समावेश आहे.  या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिका मुख्यालयात बैठक झाली. या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यारंभ आदेश पुढील आठवडय़ात द्यावा, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काम पूर्ण होण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. बैठकीला उपायुक्त शशांक भोरे, उपायुक्त यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, मुख्य अभियंता विनोद केकाण, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

25 हजार मेट्रिक टन जलपर्णी हटवली 

पवई तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याचे काम सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांत सुमारे 25 हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. मात्र जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलावात मोठय़ा प्रमाणात पह्फावली आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती वाढवणे आवश्यक असल्याचे बांगर यांनी नमूद केले.