
बलात्काराचे आरोप असलेले भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता चांगलेच अडचणीत आले आहेत. मेहता यांच्या विरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अट्रोसिटी अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आपल्यावरील हे गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी नरेंद्र मेहता यांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. 9 मार्च रोजी मेहता यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
मीरा-भाईंदर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भाजपच्या एका नगरसेविकेने केला आहे. 2014 सालानंतर आपण नरेंद्र मेहतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असल्याचा आपल्यावर दबाव टाकण्यात आल्यामुळे तक्रार दाखल केली नाही असा दावाही त्या नगरसेविकेने केला आहे. मेहतांकडून मला व माझ्या मुलाच्या जिवाला धोका असल्याचे पत्र कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले असून कारवाईची मागणी केली आहे. गेल्या आठवडय़ात मंगळवारी सभागृहात याचे पडसाद उमटल्यानंतर मीरारोड पोलीस ठाण्यात नरेंद्र मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या मेहता हे फरार असून गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे.





























































