मुंबईत शुक्रवार आणि रविवार ठरतोय अपघातवार!

मुंबईत रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातही विकेंडला म्हणजेच शुक्रवारी रात्री आणि रविवारी रात्रीच्या सुमारास अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती ट्रॅफिक पोलीस आणि ब्लूमबर्गने जारी केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. शुक्रवारी रात्री 9 ते 11 या दोन तासांत अपघात होण्याचे प्रमाण अन्य दिवसांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच रविवारी रात्री 1 ते 3 यादरम्यान अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे, असे या अहवालात म्हटले आहे. सोमवार, रविवार आणि मंगळवार या तीन दिवसांत सर्वाधिक जास्त जखमी होण्याचे प्रमाण आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 2024 मध्ये 343, तर 2023 मध्ये 384 मृत्यू झाले आहेत.

यात सर्वात जास्त मृत्यू हे रविवारी झाले असून ही संख्या 73 इतकी आहे. शुक्रवारी 58 लोकांनी आपला जीव गमावला आहे. वर्षभरात 2611 लोक अपघातात जखमी झाले आहेत. यात सर्वात जास्त रविवारी 434 जखमी झाले आहेत. सकाळच्या तुलनेत सायंकाळी वाहन चालवणे हे वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत अपघात जास्त घडले आहेत. मुंबईतील 30 अशी ठिकाणे आहेत, ज्या ठिकाणी सर्वात जास्त अपघात घडले आहेत. यात पश्चिम एक्स्प्रेस हायवे, सायन-वांद्रे लिंक रोडचे वांद्रे (पूर्व) चे कलानगर जंक्शनचा समावेश आहे.

काय काळजी घ्याल

  • रात्री उशिरा वाहन चालवणे टाळावे.
  • प्रवास करण्याआधी पुरेशी झोप घ्या.
  • दारू पिऊन वाहन चालवू नका.
  • जर खूपच आवश्यक असेल तर सार्वजनिक वाहनांचा वापर करा.
  • वेग मर्यादेचे पालन करा.
  • जर कंटाळा आला असेल तर वाहन कडेला लावून थोडा आराम करा.

मुंबईतील जीवघेणे स्पॉट

  • बैगनवाडी सिग्नल, देवनार, गोवंडी
  • जवाहरलाल नेहरू रोड (सांताक्रूझ पूर्व) चे सर्कल
  • सायन-वांद्रे लिंक रोडवरील कलानगर जंक्शन
  • माहीम कॉजवे जंक्शन
  • मानखुर्दचे टी पॉइंट
  • प्रियदर्शनी सर्कल, चेंबूर
  • अमर महल जंक्शन, चेंबूर
  • खेरवाडी जंक्शन
  • जोगेश्वरी-ट्रॉमा केअर जंक्शन
  • दिंडोशी ओबेरॉय जंक्शन
  • अंधेरी बिसलेरी जंक्शन
  • सायन सर्कल
  • संजय गांधी नॅशनल पार्क जंक्शन