
धारावी शताब्दी नगर येथील पाच इमारतींचा बांधकाम खर्च आणि व्याजाचे 183 कोटी रुपये असे मिळून 642 कोटी रुपये दिल्यानंतरच या इमारती ‘डीआरपी’च्या माध्यमातून अदानीच्या कंपनीकडे हस्तांतरित करू, अशी भूमिका म्हाडाने घेतली होती. मात्र अदानीने नुकतेच 403 कोटी रुपये म्हाडाच्या हातावर टेकवत या इमारती आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र उर्वरीत पैसे कधी मिळणार, म्हाडा 183 कोटी रुपयांच्या व्याजावर पाणी सोडणार का, हे प्रश्न अनुत्तरीत आहे.
धारावीतील सेक्टर-5चा पुनर्विकास करत म्हाडाने शताब्दी नगर येथे पाच इमारती बांधल्या. 2018 साली राज्य सरकारने सेक्टर-5सह संपूर्ण क्षेत्राचा एकत्रित विकास विशेष हेतू कंपनीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पाच इमारतींच्या मोबदल्यात म्हाडाने 642 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र व्याजाचे 183 कोटी रुपये माफ करावे, अशी मागणी अदानीच्या कंपनीने म्हाडाकडे केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममधील बैठकीनंतर म्हाडा बॅकफूटवर
शताब्दी नगरमधील पाच इमारतींच्या बांधकामाचा खर्च आणि व्याजाची रक्कम मिळाल्याशिवाय इमारतींचा ताबा देणार नाही, यासाठी म्हाडा आग्रही होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये झालेल्या बैठकीत ‘आधी मुद्दल घ्या, व्याजाचे नंतर बघू’, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर म्हाडा बॅकफूटवर आले.